Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

जस्ट ईन सेवन लाईन्स

By: Makarand Behere

November 3, 2014

0 Comments

Categories:

मी स्वप्नीला दिवेकर; डॉक्टर मानसी तपस्वीनिकडे गेले होते; त्यांना माझी ओळख करून दिली. तुम्ही विचाराल मी कशाला गेले होते त्यांच्याकडे. ओह; बरोबर; त्यांची ओळख करून द्यायची राहीली त्या मानसतज्ञ. नाही म्हणजे तुम्हाला वाटत तसं मला गरज नाही आहे. म्हणजे गरज मलाच आहे पण माझ्यासाठी नव्हे  तर स्वप्नाली साठी; माझी धाकटी बहिण; तिच्यासाठी; त्यांच्याकडे गेले आणि सरळ मुद्द्यालाच हात घातला.

मी स्वप्नीला दिवेकर; डॉक्टर; मला जरा तुमची मदत हवी आहे. माझी धाकटी बहिण स्वप्नाली दीड वर्ष  होतय कॉलेजला जाते आहे. एस. वाय.जे.सी आर्ट्स ला आहे. खूप हुशार आहे. पण एक प्रॉब्लेम आहे.  डॉक्टर ती एका प्रोफेसरच्या प्रेमात पडली आहे. जो तिच्याहून २० वर्षांनी मोठा आहे; अर्थात ३५ शीचा आहे.

डॉक्टर: ओह; आय.सी. मला सगळ समजाऊन सांगाल का?

स्वप्नीला: येस. शुअर डॉक्टर; मी आणि स्वप्नाली मुंबईत दोघी एकत्र राहातो. आमच्या मालकीची जागा आहे. घरची परिस्थिती साउंडसेफ; पण आमच्या आईवडीलांच पटत नाही. माझे वडील पुण्याला मोठे बिल्डर म्हणून प्रस्थापित आहेत. ‘दिवेकर बिल्डर्स’ हि कंस्ट्रक्शन कंपनी आमचीच; आणि आई माहेरची एकुलती एक आणि गर्भश्रीमंत त्यामुळे तिच्या माहेरून तीला संपत्ती मिळालीच आहे. आम्ही मुलत: पुण्याचे पण स्वप्नालीला कमर्शीअल आर्टीस्ट व्हायचं आहे त्यामुळे तिच्या शिक्षणासाठी आम्ही मुंबईला राहतो आहोत. मला खरी नोकरी करायची काही गरज नाही कारण आम्हाला पैशाच्या दृष्टीने काही कमतरता नाही. परंतु मला स्वत: ला एकटं बसवत नाही. म्हणून मी पेपरमध्ये आय. सी. आय. सी. आय बँकेची जाहिरात वाचली आणि मी अर्ज केला आणि मला नोकरी लागली.

त्यामुळे मी दिवसभर सतत बाहेर असते. आज स्वप्नाली १६ वर्षांची आणि मला याच २९ फेब्रुवारीला २५ व लागलं. आमची आई आमच्या बरोबरच असते. पण स्वप्नालीच आणि आमच्या आईच पटतं नाही. का माहीत नाही. पण तिला वाटत कि आई-वडिलांच्या अशा रीलेशनशीपला तीच जबाबदार आहे. खरं तर आई-वडिलांच्या अशा रीलेशनशीपला माझे वडिलच जबाबदार आहेत. कारण त्यांना त्या दोघांची जोडी मिस मॅच वाटते. कारण माझ्या आईचं शिक्षण कमी आहे. आणि ती कुरूप आहे. माझ्या वडिलांचे वडील खूप भडकु त्यांच्या समोर माझ्या वडिलांचं काहीच चालत नसे. माझे वडील इंजीनियरिंग च्या शिक्षणासाठी परदेशात गेले होते. त्याचं शेवटच वर्ष बाकी होत तेव्हाच माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांसाठी मुली बघायला सुरवात केली. माझ्या आईचे वडील पुण्यातले त्या काळचे नावाजलेले सावकार; गर्भश्रीमंत. त्यामुळे माझी आई जशी माहेरची श्रीमंत तसेच माझे आजोबाही श्रीमंत होते आणि केवळ आपल्या तोडीस तोड स्थळ हवं म्हणून माझी आई कुरूप असूनही आईला त्यांनी मान्य केल. खर तर माझ्या वडिलांचं परदेशात सुत जमल होतं पण इथे आल्यावर वडिलांनी काही सांगायच्या आत माझ्या आजोबांनी लग्नाचा बर उडवून दिला. जिच्या बरोबर वडिलांचं सुत जमल होत तो अविवाहित रहिली; ती पण पुण्याचीच. कालांतराने माझे आजी आजोबा वारले. माझ्या वडिलांसमोर माझ्या आईचं काही चालत नसे. जो पर्यंत ते एकत्र राहिले तो पर्यंत ती एका शब्दाने बोलली नाही. पण जेव्हा घटस्फोटाचा विषय निघाला तेव्हा तिने वडिलांना कडाडून विरोध केला त्यावेळेस मलाही समजायला लागल होत मी हि आईच्या बाजूने उभी राहिले. आईने वडिलांना विचारलं की ‘जर तुम्हाला मी पसंत नव्हते तर माझ्याशी लग्न का केलत?’ तेव्हा वडील म्हणाले ‘प्रश्न विचारून मोकळी झालीस पण माझा विचार केलास इतके दिवस माझ दडपण वाटत होत तुला; तसच दडपण आण्णांच माझ्यावर होत आणि आजपासून २० वर्ष आधी जर मी त्यांच्या विरोधात गेलो असतो तर मला सगळ्यापासून वंचित रहाव लागल असतं.’ बाबांचं ही बरोबर होत. त्यामुळे बाबा असा म्हणाले की, ‘आपण वेगळ राहण्यातच आपल सुख आहे. ‘खर तर २० वर्षांनी एक कुटुंब वेगळ होणार होत जे कधीही सुखी नव्हतं. की ज्याच सगळ्या समाजात हसं होणार होत पण बाबांना याचं काही सोयरसुतक नव्हत. बाबा इरेला पेटले होते. या सगळ्या घटना स्व्प्नालीच्या समोर घडत होत्या. की जी त्या वेळेला ११ वर्षांची होती. नुकतीच वयात यायला लागली होती आणि तेव्हापासुनच तिच्या स्वभावात फरक पडू लगला. लहानपणची स्वप्नाली खट्याळ; अल्लड; खुप बोलणारी; मस्ती करणारी होती. सगळ्यांच्या जीवाचा प्राण होती ती. मुळातच ती लहानपणा पासुन सुंदर; ती जरा जरी दिसली नाही की सगळे हैराण होत. तिला मुदलातच माती चिखल याच वावग होत त्यामुळे ती कधी मातीत खेळायची नाही तशीच पावसात भिजायची नाही. तिला सुंदर माणस खूप आवडायची. हे अगदी तिच्या लहानपणापासुन आमच्या ध्यानात आल होत. लहान मुलांना जन्मदात्या आईच खूप वेड असतं. पण हीला आई ऐवजी बाबांचा खूप लळा होता. आणि बाबांची हि ती खूप लाडकी होती. ती माझ्याकडेही फिरकायची नाही पण या घटनेच्या दरम्यान अस ठरलं की मी आई जवळ रहाणार आणि स्वप्नाली बाबांजवळ. पण आईला माहिती होत की वडिलांच्या व्यापामुळे वडिलांना तिच्यावर निट लक्ष ठेवता येणार नाही म्हणून आई मला व स्वप्नालीला घेऊन वेगळी झाली व वडिलांकडून दर महिन्याला काही रकमेची सोय केली. खर तर काही गरज नव्हती. कारण आईच्या पैशात आमचं चांगलं भागल असतं. पण वडिलांवर आपला थोडा तरी अंकुश रहावा आणि वडिलांना थोडी तरी आमची जाण राहावी. पण त्याने काही फरक पडला नाही. त्यानंतर मी एके दिवशी वडिलांना भेटायला गेले तेव्हा माझा भ्रमनिरास झाला. परदेशातली ती अविवाहिता मी वडिलांच्या बिछान्यावर झोपलेली बघितली; तुम्ही मला विचाराल की तु तीला कसं ओळखलस तर तिचा फोटो मी बाबांच्या कपाटात चोरुन बघितला होता. स्वर्गातल्या अप्सरांना लाजवेल असं सौंदर्य होत तीचं. पण माझ अवसानच गळाल. तो बाबांच्या निर्लज्ज पणाचा कळस होता. पण याचा परिणाम असा झाला की स्वप्नीला जेवेनाशी झाली. एकेदिवशी तिने इतकं आकांडतांडव केलं की बाबांना परत बोलवावं लागलं पण बाबा आलेच नाहीत. हे जेव्हा तिला समजल तेव्हापासून ती गप्प झाली.

मी माझ्या आईवर गेलेय. तर स्वप्नाली वडिलांवर. त्यामुळे ती माझ्या वडिलांसारखीच सुरेख आहे. ती हुशार आहे; गुड लुकिंग आहे. पण मला वाटत की ती कुठे तरी स्वत: ला असुरक्षित समजते. त्यामुळे ती जास्ती कोणात मिसळत नाही. रागीट आहे. अबोल आहे. स्वत:तच गुंतलेली असते. सतत काहीतरी शोधत असते. कुठेतरी कोणाचातरी आसरा शोधत असते. हल्ली तिचं विसरण्याच प्रमाणही वाढलं आहे; जेवायचं विसरते; जेवायला बसली तर धड नीट जेवतही नाही. शुन्यात बघत असते. दररोजची स्वच्छताही विसरली आहे. दिवस दिवस आंघोळ करत नाही. तिला प्रत्येक वेळी जबरदस्ती करावी लागते.

माझे वडील पैसे पाठवत असतात. ते माझी आई स्वीकारते पण माझे वडील इकडे कधी फिरकतच नाहीत. एकंदर ह्या सगळ्या प्रकारामुळे आईला अस्थम्याचा त्रास सुरु झाला. तशी आई गादीला खिळुन असते. फक्त मलाच माहित आहे की ती आतून कुढत असते. त्यामुळे मी आईच्या बाजूने असल्याने स्वप्नाली माझा आणि आईचा रागराग करत असते. दिवस दिवस माझ्याशी आणि आईशी बोलत नाही. मी तिला म्हटलं की तू आमच्याशी बोलत का नाहीस तर म्हणाली तू आणि आई जबाबदार आहत या गोष्टीला स्वत:लाच विचारून बघा म्हणजे उत्तर सापडेल. तर मी तिला म्हणाले काय कमी आहे ग तुला सगळ तर मिळतंय तुला जे जे मागशील ते. कधी नाही हा शब्द ऐकलास आमच्याकडुन; कशाची कमतरता आहे ग तुला. तर ती उत्तरली ‘बाबांची’

डॉक्टर: कसं आहे न स्वप्निला की हे वयच अस असतं की म्हणजे साधारणत: १४ ते २०; मुलींच्या बाबतीत १०; ११ व्या वर्षापासुन; या वयात मुलांच्या शारिरीक वाढीप्रमाणेच मुलांची मानसिक जडण घडण नव्याने होत असते. मुलं आपल्या भवितव्याबाबत; आपल्या जोडीदाराबाबत नविन नविन स्वप्न बघत असतात. आपल्या शरीरात होणाऱ्या बदलाने त्यांची विचार करण्याची पद्धत बदलत असते. अपोझिट सेक्स बद्दल त्यांच आकर्षण वाढत असतं. आणि एखादवेळ त्याचाच हा परिपाक असावा. आणि तू सांगितलेल्या तुमच्या घरच्या एकंदर परिस्थिती वरून हे सहज शक्य वाटतं की ती एखाद्या मोठ्या माणसाचा आसरा शोधत असावी.

स्वप्नीला : नाही ….

डॉक्टर: एखादवेळ ती ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी ही बोलु शकत नाही आणि बाहेरच्यांशी ही बोलू शकत नसेल. तिला समजून घेणार; तिच्या वयाच आणि तिच्याहून मोठ्ठ सापडत नसेल आणि म्हणूनच दोन्ही बाजूनी तिची गळचेपी होत असेल; ती तिचं मत व्यक्त करू शकत नाही आणि म्हणुनच ती अबोल; स्वत:त गुंतलेली राहत असेल. एखादवेळ ती तिरसटासारखीही वागत असेल आणि म्हणुनच एखादवेळ त्याच्यात आपल्या वडिलांना शोधत असावी.

स्वप्नीला : नाही तसं नाहीए डॉक्टर …. साधारणत: एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी सकाळी कपडे वॉशिंग मशीनमध्ये घालण्यासाठी टाकत होते तेव्हा स्वप्नालीच्या जीन्स च्या खिशातुन एक चिट्ठी बाहेर पडली. त्या चिट्ठी वर बरंच काहीस बदाम वगैरे रेखाटल होत. जस्ट मनात आलं म्हणुन चिठ्ठी मी उघडली आणि वाचली आणि मला या गोष्टीचा उलगडा झाला. ती चिट्ठी बरेच दिवसापुर्वीची म्हणजे बहुतेक सहा महिन्यापुर्वीची असावी. कारण त्या चीठ्ठीनुसार तिचं प्रेम प्राथमिक अवस्थेतलं असावं. कारण त्या चिट्ठीत त्याच वर्णन तीने ‘स्वप्नातला राजकुमार’किंवा आजचा हृतिक रोशन वैगेरेशी बरंच मिळत जुळत आहे कि अस वाटत की ती व्यक्ती अशी असेल की जिच्या प्रेमात कोणतीही मुलगी पडेल. हॅन्डसम, हुशार, चतुर, उंच, बांधेसुद, आकर्षक. मी या बाबत माझ्या ऑफिसमधल्या; माझ्या इतर मैत्रिणींशी चर्चा केली तर त्यांच मत पडलं की एकतर्फी प्रेम असावं. पण माझा विश्वास बसेना म्हणुन मी ती घरी नसताना तिचं कपाट ड्राॅवर शोधला. ती रोजनिशी लिहिते म्हणून तिची डायरी वाचली. तर कळलं की प्रकरण फार पुढपर्यंत गेलय. अगदी शारीरिक संबधापर्यंत एकदा नाही दोनदा तीनदा आणि माहिती नाही आणखी किती वेळा.

गेले काही दिवस तो बरीच अपसेट असते. तिचं डोक दुखत असतं. का तर तीच आणि त्याच भांडण झालंय ते पण वयाच्या फरकावरून ‘आपल्या दोघांचे पटू शकत नाही. आपण दोन ध्रुवांची दोन टोकं आहोत.’ ही गोष्ट तिला आधी लक्षात यायला नको होती. म्हणून मी तिची कान उघाडणी केली की तुझ वय काय त्याच वय काय तर म्हणाली प्रेमाला कशाच ही बंधन नसत; नंतर विचारलं की त्याचं लग्न झालंय का तर म्हणाली होय; मग विचारलं त्यांच्या बायकोला कळल तर? म्हणाली ते तिला डिवोर्स देणार आहेत आणि माझ्याशी लग्न करणारेत; तिला म्हटलं ली आयुष्य हे काय चित्रपटा सारखं वाटल का? तर तिने माझ्या ब्रेक ऑफ चा विषय काढला आणि म्हणाली ‘तू जशी प्रेमात अपयशी ठरलीस तसं मला अपयशी व्हायचं नाहीए; मला माझ प्रेम पूर्णत्वाला न्यायचंय.’ ती मागे हटायलाच तयार नाहीये आणि हल्ली बरेच दिवस ती कॉलेजला जात नाहीए.

डॉक्टर: ओके. तर मामला असा आहे. म्हणजे तुझ्या झालेल्या ब्रेक ऑफ चा पगडा पण तिच्या मनावर आहे. स्वप्नीला उद्या मला अपॉयन्टमेन्ट जास्त नाहीएत. उद्या तू तिला घेऊन ये. उद्यापासुनच मी तिला ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करते.

स्वप्नीला : थॅन्क यु डॉक्टर; आणि मी उद्या तिच्या कॉलेज मधील मुख्याध्यापकांना भेटुन येते आणि त्या प्रोफेसरची तक्रार करते.

दुसऱ्या दिवशी मी तिच्या कॉलेज मध्ये गेले आमि मुख्याध्यापक अ. विचारे यांना भेटले. आणि त्यांना स्वप्नाली आणि ते मानसशास्त्राचे प्राध्यापक स्वप्नकुमार कारखानीस यांच्या बाबत सर्व काही सांगितले . त्यावर विचारे सर म्हणाले की मॅडम तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमची बहीण स्वप्नाली दिवेकर आमच्या कॉलेज मध्ये शिकत्ये पण गेले सहा महीने ती कॉलेज मध्ये कोणत्याही लेक्चरला उपस्थित नाहिए. वा तिला कॉलेजच्या आवारात कुणी पाहिलं ही नाहीए. तिच्या मैत्रिणीनेच ही माहिती आम्हास पुरवली. आणि तुम्ही ज्या प्रोफेसरचे वर्णन तशा प्रकारचे कुणी स्वप्नकुमार कारखानीस आमच्या कॉलेजमध्ये शिकवत हि नव्हते; शिकवत हि नाहीत आणि अशा कुणा प्रोफेसरची कॉलेज मध्ये नवीन नियुक्ती हि झालेली नाही. किंवा अशा वर्णनाची कोणतीही व्यक्ती आमच्या कॉलेज मध्ये कोणत्याही विभागात अथवा कोणत्याही श्रेणीत कार्यरत नाही.

विचारे सरांचे ते शब्द माझ्या डोक्यात असे घुमु लागले की मला आता आठवत ही नाही की मी त्यांचे आभार मानले की नाही मी तशीच उठले. बाहेर आले. डॉक्टर तपस्वींना फोन केला आणि म्हणाले डॉक्टर जशा असाल तशा या; हा हा माझा पत्ता; मला तुमची गरज आहे; इट्स अर्जंट.

मी तशीच घरी दारापाशी आले. दर अलगद उघडले; आई झोपली होती. आईला थांगपत्ता लागु न देता आतमध्ये स्वप्नालीच्या खोलीत गेले. स्वप्नाली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मी तो लिफाफा उघडला आणि त्यातली चिट्ठी वाचली; ‘प्रिय स्वप्नकुमार मी तुमची लाडकी स्वप्नाली आज तुम्हाला या जगाला सोडून जात आहे. तुम्ही आयुष्यात आलात वाटलं की कोणी तरी आपलं माणुस भेटलं की ज्याच्याकडून मला प्रेम मिळेल जे मी शोधत होते. वाटलं होत की आपलं लग्न होईल आपला संसार बहरेल पण तुम्ही काल मला ‘मी माझ्या पहिल्या बायकोला सोडु शकत नाही आणि आपल्या वयातल अंतर हे खूप मोठ आहे की जे आपलं लग्न झाले तर समाजाला पटणार नाही’ या कारणास्तव लग्नासाठी नकार दिलात. या नकारामुळे मी हे जग सोडुन जात आहे. आपलं हे प्रेमप्रकरण माझ्या घरी हि समजले आहे की ज्यांना मी सडेतोड उत्तरे देऊन आपल्या लग्नाला अनुकूल परिस्थिती निर्माण केली होती. पण तुम्हीच बुजदील कायार डरपोक निघालात; शेवटपर्यंत तुमची स्वप्नाली.’

दारावरची बेल वाजली; आई ही जागी झाली; मी दरवाजा उघडला दारात डॉक्टर तपस्वी उभ्या होत्या आणि त्यांच्या बरोबर स्वप्नालीच्या वर्णनाशी मिळताजुळता एक पुरुष.

समाप्त

Leave a Reply

Cateogories

Visits